आदित्य ठाकरेंसह हजारो जेन-झींचा मूक मोर्चा; अमित ठाकरे आणि तेजस ठाकरेही मैदानात उतरले… लोकशाहीच्या रक्षणासाठी हल्लाबोल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारची हुकूमशाही आणि पोलिसांच्या दंडुकेशाहीला न जुमानता लोकशाहीच्या रक्षणासाठी आज हजारो देशभक्त जेन-झी आणि नागरिक तोंडावर काळय़ा फिती बांधून आणि तिरंगा झेंडा हाती घेऊन मुंबईत रस्त्यावर उतरले. ‘भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हटाओ…, नही रुकेंगे, नही झुकेंगे, हमे चाहिए आझादी, वोट चोरोंसे आझादी’  अशा घोषणांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क दणाणून गेले. शिवाजी पार्क परिसरात देशभक्तीचे तुफानच आले होते. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळय़ाजवळ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन करण्यात आले. मनसे नेते अमित ठाकरे आणि तेजस ठाकरेही मैदानात उतरले. शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या वतीनेही संविधान रक्षणासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. ‘गद्दार ज्ञानूच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलने होतच राहतील’, असा इशारा यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि शिवसेना भवनजवळ रविवारी आंदोलनासाठी आलेल्या शेकडो आंदोलकांना पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले होते. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना भवन तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर धरणे धरल्यानंतर पोलिसांना त्या आंदोलकांची सुटका करावी लागली. त्यानंतर या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आज शिवाजी पार्कवर मूक आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांतील हजारो शिवसैनिकांसह तरुण-तरुणी ज्ञानेशकुमार राजीनामा द्या… सारे जाहील कहा मिलेंगे… बीजेपीके दफ्तर मे, अशा घोषणा देत शिवाजी पार्कवर पोहोचल्या.

या आंदोलनात शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते – आमदार सुनील प्रभू, अॅड. अनिल परब, शिवसेना नेते राजन विचारे, शिवसेना उपनेते – आमदार मनोज जामसुतकर, अमोल कीर्तीकर, नितीन नांदगावकर, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, आमदार वरुण सरदेसाई, अजय चौधरी, सुनील राऊत, हारून खान, महेश सावंत, अनंत (बाळा) नर, नितीन देशमुख महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, माजी आमदार विलास पोतनीस, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सूरज चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, सोमनाथ सांगळे, रमेश कोरगावकर, नगरसेवक किरण तावडे, निशिकांत शिंदे, अंकित प्रभू, नगरसेविका श्रद्धा जाधव, माधुरी मांजरेकर, रश्मी पहुडकर, रोशनी कोरे-गायकवाड, मनसे नेते संदीप देशपांडे, नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

घोषणा घुमल्या…

अब हर घर जंतर मंतर!

हमें चाहिए आझादी,

बीजेपी से आझादी!

किन लोगो ने बेचा देश…

मोदी, शाह और ज्ञानेश!

सारे चोर कहा मिलेंगे,

बीजेपी के दप्तर में!