
शिवसेना ही चार अक्षरे जनमानसाच्या सुख दुःखाशी जोडली गेली आहेत. त्यामुळे कायमच शिवसेनेची मशाल तेजाने तळपत राहील, असा ठाम विश्वास शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 14 मधील जाईबाई साईनगर येथील महालक्ष्मी शॉपिंग सेंटर परिसरातील साई टॉवर येथील नव्या शाखेचे उद्घाटन राजन विचारे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या जोशात भगवा फडकावत जल्लोष केला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही शाखा सुरू केली आहे. नव्या शाखेच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणे आणि पक्ष संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे राबविले जाणार असल्याचे शहर युवाधिकारी अॅड. नीरज कुमार यांनी सांगितले. या सोहळ्याला जिल्हाप्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख नारायण पाटील, राजेंद्र शाहू, भीम मोरे, शहरप्रमुख हेमंत चौधरी, बाळा परब, महिला शहर संघटक मीना माळवे, पुरुषोत्तम चव्हाण, सदानंद तिवारी, अरुण उगले, उमेश परब, अभय देसाई, अमित उगले, दत्ता पाखरे, संगीता गांधी, सारिका जाधव, नलिनी गायकवाड, समीर वेदपाठक, अरुण निंबाळक, संतोष देवळेकर, समीर शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिकांची एकजूट
कल्याण पूर्व हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आजही निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेसोबत ठामपणे उभे आहेत. आज जे काही नेते घडले त्यांना घडवण्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा असल्याचे राजन विचारे यांनी नमूद केले. पक्ष संघटना, शिवसैनिकांची एकजूट आणि स्थानिक पातळीवरील कार्य याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.



























































