
शिवसेनेचचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला आज तेरा दिवस उलटले. पाच मुख्य संशयित आरोपींना अटक केली असली तरी हत्येमागील खरे मास्टरमाइंड मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे दोघेही मोकाट आहेत. त्यांना चौकशीसाठी का बोलवत नाही, असा संतप्त सवाल आज पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी केला. आम्हाला न्याय मिळावा यासाठी आता पूर्णेकर कुटुंबीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरच आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सत्ताधाऱ्यांची मुजोरी, ड्रग्जमाफिया आणि बिल्डर लॉबीविरुद्ध नेहमी लढा उभारणारे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी त्यांच्या कार्यालयातच गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने ठाणे जिल्हा हादरून गेला. शुक्रवारी ‘भयमुक्त ठाणे’ करा, अशा घोषणा देत शिवसेनेसह मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, धर्मराज्य पक्ष, आरपीआय, आप या पक्षांनी व भूमिपुत्रांच्या संघटनांनी एकत्र येत पोलीस आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चाही काढला. आज प्रसारमाध्यमांशी संपर्क साधताना राम पूर्णेकर यांनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले तसेच एकनाथ शिंदे यांच्या घरावर आंदोलन करणार असल्याचेही सांगितले.
ठाणे पोलिसांच्या एसआयटी पथकाने केवळ गोळ्या झाडणारे आणि प्रत्यक्ष मदत करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. मात्र मूळ कट रचणारे सूत्रधार अजूनही मोकळे फिरत असल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी आज केला आहे. आमचा आधारस्तंभगेला आहे, आम्ही न्याय मिळेपर्यंत लढत राहणार असा इशारा त्यांनी दिला. पोलिसांवर अजूनही प्रचंड राजकीय दबाव आहे. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर आम्हाला दाट संशय असताना त्यांचा साधा राजीनामा का घेतला जात नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी का बोलवले जात नाही, असा सवाल पूर्णेकर कुटुंबाने केला आहे.
पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित जयसिंग उर्फ पपलू या दोघांना पोलिसांनी प्रयागराज येथून रविवारी ठाण्यात आणले. या दोघांना आज ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 आक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर पप्या शिंदेच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. या हत्येसाठी दोन पिस्तूल आणि तीन चॉपर वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी एक पिस्तूल नितेश पवार उर्फ भावड्या याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. उर्वरित पिस्तूल आणि तीन चॉपर हस्तगत करायचे आहेत. ही शस्त्रे कुठून आणि कोणाकडून मिळवण्यात आली तसेच त्यासाठी कोणी आर्थिक मदत केली, याचाही तपास पोलीस करत आहेत.
आरोपींच्या घरांची झडती, बँक खात्यांची माहिती घेणार
टल्ली आणि पपलू यांच्या घरांची झडती घेणे, त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवणे आणि आर्थिक व्यवहार तपासणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. अटकेत असलेल्या सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी करायची असल्याने विशेष तपास पथकाने पोलीस कोठडीची मागणी आज केली. त्यानुसार न्यायालयाने तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
हेल्मेटधारी आरोपीवर शंका
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला हेल्मेटधारी आरोपी अमित सिंग उर्फ पपल याला दोनच दिवसांपूर्वी प्रयागराज येथून पोलिसांनी अटक केली आहे. या हेल्मेटधारी आरोपीवर राम पूर्णेकर यांनी संशय व्यक्त केला आहे. घटनेच्या दिवशी हेल्मेटधारी आरोपीची देहबोली आणि पकडण्यात आलेला आरोपी यामध्ये साम्य नसल्याचे राम पूर्णेकर यांनी आज सांगितले. दरम्यान घटनास्थळ आणि समतानगर येथून पसार होताना त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करावी, अशी मागणी राम यांनी पोलिसांकडे केली आहे.
भाजप नेत्यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट पूर्णेकर कुटुंबीय घेणार आहेत.
हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी राम पूर्णेकर यांनी केली आहे. स्थानिक राजकीय दबावामुळे तपास भरकटण्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.




























































