
टेंभी नाक्यावरील जत्रेत तुम्हाला दुकान लावायचे असेल तर रोज पाचशे रुपये द्यावे लागतील. मी ठाणे महापालिकेचा अधिकारी आहे. पैसे द्या नाहीतर दुकान लावू देणार नाही, असे सांगून या जत्रेत वसुली करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. योगेश गुप्ता (21) असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे महाराष्ट्र शासन असे लिहिलेली पट्टीदेखील आढळून आली आहे.
तक्रारदार सुनीता चिम्बलिया या वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या महिला कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी देवीच्या यात्रेनिमित्त जांभळीनाका येथील पतंजली दुकानासमोरील रस्त्यावर कपड्यांचे दुकान लावले होते. रात्री सवाआठच्या सुमारास पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला योगेश गुप्ता हा तरुण त्यांच्याजवळ आला. रस्त्यावर दुकान का लावले, परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा करत त्याने विक्रेत्या महिलांना दमदाटी केली. आपण ठाणे पालिकेचे अधिकारी असल्याचे सांगत कारवाईची धमकीही दिली.
कपड्यांना लाथ मारून रस्त्यावर फेकले
तोतया अधिकाऱ्याने गळ्यातील निळ्या-पांढऱ्या रंगाची, महाराष्ट्र शासन असे लिहिलेली पट्टी दाखवली. यात्रेच्या कालावधीत दुकान लावायचे असेल तर दररोज 500 रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. तसेच परिसरातील माया गौरसवा आणि राधा साथलिया या दोन महिलांच्या कपड्यांनाही लाथ मारून ते रस्त्यावर फेकण्यात आले. त्यांच्याकडेही प्रत्येकी 500 रुपयांची मागणी करण्यात आली.


























































