
देवरुख – बामणोली मार्गावरील मारळ येथे सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास खडी वाहून नेणारा डंपर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या मार्गावर सलग दुसऱ्यांदा डंपरचा अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्या देवरुख – बामणोली मार्गावर रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी लागणारी खडी, माती व अन्य साहित्याची वाहतूक दिवस-रात्र डंपरच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र, या मार्गावरून धावणारे डंपर अत्यंत भरधाव आणि बेदरकारपणे चालवले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास मारळजवळ असाच एक भरधाव खडीचा डंपर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला पलटी झाला. अपघाताचा आवाज होताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याच मार्गावर अगदी काही दिवसांपूर्वीच असाच एक अपघात घडला होता. पाठोपाठ झालेल्या या दुसऱ्या अपघातामुळे मारळ व परिसरातील ग्रामस्थांचा संयम आता सुटत चालला आहे.
रस्त्याचे काम त्वरित पूर्ण व्हावे ही सर्वांचीच इच्छा असली, तरी ठेकेदार आणि डंपर चालकांच्या या बेदरकार व भरधाव वाहतुकीमुळे प्रवाशांच्या व ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने या भरधाव डंपर चालकांवर त्वरित चाप लावावा आणि सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

























































