
राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस नवी मुंबई) आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या (आयबी) पथकाने सोमवारी सकाळी राजापूर शहरात अचानक संयुक्त छापा टाकून एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी अशा तिघांना ताब्यात घेतल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या गोपनीय कारवाईनंतर तिघांनाही तातडीने राजापूर पोलीस ठाण्यात आणून दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या चौकशी सत्रानंतर संबंधितांना सोडण्यात आले असले, तरी या अनपेक्षित कारवाईमुळे शहरात उलटसुलट चर्चांना मोठे उधाण आले आहे.
सोमवारी भल्या पहाटे सातच्या सुमारास एटीएस व आयबीचे वरिष्ठ पथक राजापूर शहरात दाखल झाले होते. या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. एका आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेशी संबंधित असलेल्या व्हॉट्सॲप समूहाशी या कुटुंबाचा संपर्क असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. मात्र, तपास यंत्रणांनी आणि स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता पाळली असून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
या संवेदनशील कारवाईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही स्वतः राजापूर पोलीस ठाण्याला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही काळात घडलेल्या विविध घडामोडींमुळे राजापूर शहर संवेदनशील केंद्र म्हणून पुढे येत असतानाच, थेट राष्ट्रीय व राज्यस्तरीय गुप्तचर यंत्रणांनी स्थानिक पातळीवर धडक दिल्याने प्रशासकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. दिवसभर चाललेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर सायंकाळी तिघांनाही घरी पाठवण्यात आले असले, तरी कारवाईमागील गूढ अजूनही कायम आहे.

























































