राजापूर आगाराच्या मनमानी कारभाराचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका, साखर कोंबेत चार-चार तास बससाठी ताटकळणाऱ्या मुलांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्यातील साखर कोंबे येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयातील विद्यार्थ्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नियोजनशून्य कारभारामुळे दररोज प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शाळा सुटल्यानंतरही बस उपलब्ध नसल्याने कोवळ्या विद्यार्थ्यांना तब्बल चार तास शाळेच्या आवारात ताटकळत बसावे लागते. प्रशासनाने तातडीने फेऱ्या सुरळीत न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा सक्त इशारा स्थानिक सरपंच दशरथ मांजरेकर यांनी दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर राजापूर आगाराकडून जैतापूर-साखर कोंबे मार्गे राजापूर अशी बस फेरी सुरू करण्यात आली होती. एसटीच्या या वेळापत्रकाचा मेळ बसावा म्हणून शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांनी सामंजस्य दाखवून शाळेची वेळ बदलून घेतली होती, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेवर घरी पोहोचून दैनंदिन अभ्यास पूर्ण करता येईल. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही बस ठरलेल्या वेळेवर न येता थेट रात्री सात ते साडेसातच्या सुमारास शाळेच्या आवारात दाखल होत आहे. त्यामुळे सायंकाळी चार वाजता सुटणाऱ्या शाळेतील मुले रात्री आठ वाजेपर्यंत रस्त्यावरच अडकून पडत असल्याचे संतापजनक चित्र निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातील जंगलमय, कच्च्या रस्त्यांवरून रात्रीच्या सुमारास प्रवास करताना जंगली आणि सरपटणाऱ्या श्वापदांचा मोठा धोका विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकतो. थकलेल्या आणि उपाशीपोटी घरी पोहोचणाऱ्या या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होणार कसा, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. या गंभीर समस्येबाबत राजापूर आगाराचे अधिकारी कदम यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून अवगत करूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी अनुचित दुर्घटना घडल्यास त्याला पूर्णपणे राजापूर एसटी महामंडळच जबाबदार असेल, असा इशारा देत ग्रामस्थांनी आता रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.