
केंद्रातील मोदी सरकारमधून एका मोठ्या राजकीय घडामोडीची बातमी समोर आली आहे. माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या मंत्रिपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे केवळ मंत्रिपदच नव्हे तर आपली राज्यसभेची खासदारकीही सोडण्याची परवानगी त्यांनी पंतप्रधानांकडे या पत्राद्वारे मागितली आहे.
काय आहे कारण?
एल. मुरुगन यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामागील मुख्य कारणही समोर आले आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात मुरुगन यांनी म्हटले आहे की, तमिळनाडू राज्यामध्ये भाजप आणखी बळकट करण्यासाठी आणि पक्ष संघटनेसाठी त्यांना आपला पूर्ण वेळ द्यायचा आहे. पक्षाच्या वाढीसाठी वेळ देता यावा म्हणूनच त्यांनी मंत्रीमंडळातून आणि राज्यसभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या अनपेक्षित राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



























































