
चिपळूण नगरपरिषदेची जुनी इमारत ‘शेंगदाणा बिल्डिंग’ पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, नवीन बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याची खात्री झाल्याशिवाय सध्याची इमारत पाडू नये, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या नगराध्यक्षांकडे पत्राद्वारे केली आहे. या विषयावर शहरातील ज्येष्ठ, जाणकार आणि अनुभवी नागरिकांसह सर्वपक्षीय बैठक आयोजित करून सविस्तर चर्चा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नवीन इमारतीचे बांधकाम १५ ते २० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त करताना, एकूण अपेक्षित खर्चाच्या किमान ५० टक्के निधीची ठोस तरतूद उपलब्ध झाल्याशिवाय सध्याची इमारत पाडण्याचा विचारही करू नये, असे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे. नवीन इमारतीचे नियोजन, अंदाजित खर्च, निधीची उपलब्धता आणि बांधकामाचा कालावधी याबाबत पारदर्शकपणे चर्चा व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे.
सुमारे १५० वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन इमारत आजही दिमाखात उभी असल्याचे नमूद करून, नगरपरिषदेने त्यानंतर बांधलेली दुसरी इमारत अवघ्या २५ ते ३० वर्षांत निकामी झाल्याने पाडावी लागली, याकडे त्यांनी या पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. त्या ठिकाणी अद्याप नवीन बांधकाम सुरू झालेले नाही. तसेच चिपळूणमधील मटण मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मंडई, शासकीय विश्रामगृह आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या वास्तूंच्या पूर्वेतिहासातून धडा घेऊन भविष्यातील बांधकामांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आर्थिक नियोजन आणि निधीची खात्री न करता घाईघाईने नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका आमदार जाधव यांनी मांडली आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी ज्येष्ठ नागरिक, जाणकार व्यक्ती आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींना विश्वासात घेऊन बैठक आयोजित करावी आणि सर्व संबंधित माहिती समोर ठेवूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता नगराध्यक्ष व नगरपरिषद प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे चिपळूण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



























































