Ranji Trophy 2026/27 – मुंबईचा विजयाने श्रीगणेशा! चंदिगडचा 1 डाव आणि 155 धावांनी पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश पुराणिक

मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत मुंबईने चंदिगडचा 1 डाव आणि 155 धावांनी दारुण पराभव केला आणि यंदाच्या रणजी हंगामाचा विजयाने श्रीगणेशा केला. तिसऱ्या दिवशी चहापानाच्या काही मिनिटे आधी या चंदिगडचा डाव 196 धावांमध्ये आटोपला आणि मुंबईने मोठा विजय मिळवला. पहिल्या डावात हॅट्ट्रिकसह 5 आणि दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेणाऱ्या तुषार देशपांडे याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

चंदिगडचा पहिला डाव 78 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर मुंबईने 351 धावांची मोठी आघाडी घेतली. मुंबईने चंदिगडला पुन्हा फलंदाजीला पाचारण केले.  दुसऱ्या डावातही मुंबईने दमदार गोलंदाजी केली. दुसऱ्या दिवसाखेर चंदिगडचा एक खेळाडू बाद करत मुंबईने सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागेल याची काळजी घेतली. मात्र पहिल्या सत्रात चंदिगडच्या फलंदाजांनी मुंबईच्या धारधार गोलंदाजीचा चांगला सामना केला. सलामीवीर अर्जुन आझाद याने अर्धशतकी खेळी करत पराभव लांबवला. बाद होण्यापूर्वी त्याने 71 चेंडूत 62 धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

अर्जुन मैदानात असताना दुसऱ्या बाजूने मात्र एकामागोमाग एक विकेट्स जात होत्या. मोहम्मद अर्सलन खान 20, मनन वोहरा 14 धावा काढून बाद झाल्याने चंदिगडची अवस्था 3 बाद 87 अशी झाली. त्यानंतर अर्जुनला शम्स मुलानी याने बोल्ड करत मुंबईच्या विजयातील सर्वात मोठा अडथळा दूर केला. पाठोपाठ राज बावा 5 आणि दीपेंदर सिंह 5 धावा काढून बाद झाला.

शिवम भांबरी याने तळाच्या खेळाडूना हाताशी धरत छोट्या छोट्या भागीदारी केल्याने मुंबईला विजयासाठी चहापानापर्यंत वाट पाहावी लागली. मात्र भांबरी 44 धावांवर बाद झाल्यानंतर पुढील दोन विकेट्स 5 धावांमध्ये घेत मुंबईने विजय मिळवला. तनुश कोटीयान याने अखेरची विकेट घेत मुंबईला विजयी केले. मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुश आणि मुलानी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर तुषार देशपांडे याने 2, मोहित अवस्थी आणि सिल्वेस्टर डिसुझा याने प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 429 धावा उभारल्या. कर्णधार सिद्धेश लाड याने सर्वाधिक 86 धावा केल्या, तर मुशीर खान याने 68 धावांचे योगदान दिले. तनुश यांनी 58 धावांची धावांची अर्धशतकीय खेळी केली. मात्र टीम इंडियाकडून खेळणारे यशस्वी जैस्वाल आणि सरफराज खान यांनी निराश केले. यशस्वीला खातेही उघडता आले नाही, तर सरफराज 1 धाव काढून बाद झाला.

आयुष म्हात्रे याला दुखापत

दरम्यान, या लढतीत मुंबईचा सलामीवीर आयुष म्हात्रे याला दुखापत झाली आहे. उजव्या मांडीचा स्नायू दुखावल्याने तो जवळपास दोन महिने मुंबईच्या संघातून बाहेर गेला आहे. कर्णधार सिद्धेश लाड याने याबाबत माहिती दिली. दुसरीकडे यशस्वी देखील न्यूझीलंड दौऱ्याला रवाना होणार असल्याने आगामी हरियाणा विरुद्ध लढतीत मुंबईकडून नवीन जोडी सलामीला येईल. तसेच शार्दुल ठाकूर हा देखील आगामी एक ते दोन सामने संघातून बाहेर राहील आणि त्यानंतर पुनरागमन करेल असेही लाड याने स्पष्ट केले.