
“आमची टीम थांबणार नाही. आज नाही तर उद्या, काही महिन्यांत किंवा वर्षांत, पण आम्ही आमचे अंतिम ध्येय गाठूनच राहू,” असा विश्वास व्यक्त करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोधकांचा हा लढा यापुढेही सुरूच राहणार असून आगामी काळातही देशाला सरप्राईज देत राहणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांची लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.
राहुल गांधी म्हणाले, “मी काल पत्रकार परिषदेत ‘दृढता’ हा एक शब्द वापरला होता. आमची ही टीम अजिबात थांबणार नाही. आज नाही तर उद्या, परवा, तीन महिन्यांत, सहा महिन्यांत, एका वर्षात किंवा दोन वर्षांत… पण आम्ही थांबणार नाही. आम्ही आमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचूनच दाखवू.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या लक्ष्यापर्यंत कसे पोहोचणार आहोत, हे मी आत्ताच सांगू शकत नाही. कारण तसे केल्यास सरप्राईज संपून जाईल. देशवासीयांसाठी आणि तुमच्यासाठी हा उत्साह अन् सरप्राईज कायम राहावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र मी तुम्हाला एक खात्री नक्की देतो की, ज्या ऊर्जेने, ताकदीने आणि एकजुटीने आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, अगदी त्याच भावनेने आम्ही यापुढेही मिळून हा लढा लढत राहू.”
राहुल गांधी म्हणाले की, “ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील या लढ्यात संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे. ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक प्रणाली उद्ध्वस्त केली आहे. एक प्रकारे लोकशाहीची हत्या झाली आहे.” ते म्हणाले, “चोरीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना शिक्षा केली जाईल.”


























































