
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक झाल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सध्या सौरव दास आशुतोष रांका हे तिहार तुरुंगात असल्याचे समजते. या वरून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. दिपके आज दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
”नरेंद्र मोदी हे एक डरपोक हुकुमशहा आहेत. या देशात तिरंगा फडकवणं गुन्हा आहे का? जंतरमंतरवर तिरंगा फडकवला म्हणून आशुतोष आणि सौरवला पाच दिवस तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ही हुकुमशाही आहे. आपल्या देशात अशा प्रकारची परिस्थिती ब्रिटीशांच्या काळात होती. ब्रिटीश हिंदुस्थानात होते तेव्हा सार्वजनिक तिरंगा फडकवल्यावर लोकांना तुरुंगात डांबले जायचे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणण्याच्या लायकीचे नाहीत”, असे दिपके म्हणाले.




























































