
कोकण रेल्वे प्रकल्प उभारताना अनेकांनी बलिदान दिले आहे. प्रकल्प उभारताना झालेल्या 15 अपघातात 95 जणांनी आपले प्राण गमावले. कोकण रेल्वेचा प्रकल्प उभारताना शहिद झालेल्या कामगारांना आज 29 व्या स्मृतिदिनी रत्नागिरी स्थानकासमोरील श्रम शक्ती स्मारक येथे आदरांजली वाहण्यात आली.
कोकणच्या दऱ्या खोऱ्यातून कोकण रेल्वेची उभारणी हे एक मोठे आव्हान होते. कोकण रेल्वेच्या अभियंते, कर्मचारी, कामगारांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलत अशक्य वाटणाऱ्या कोकण रेल्वे प्रकल्पाची उभारणी केली. या उभारणी मध्ये विविध ठिकाणी झालेल्या 15 अपघातांमध्ये 12 राज्यातून आलेल्या 95 कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत आज, 14 ऑक्टोबर 2026 सकाळी कोकण रेल्वेच्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी स्मृती स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी रत्नागिरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपस्थित होते.




























































