
डोळखांबजवळील स्टोन क्रशर व दगडखाणीच्या सुरूंग स्फोटांनी शहापूर तालुक्यातील घरांना तडे गेले आहेत. या ब्लास्टिंगमुळे टेंभुर्ली-मांजरे गावचा परिसर हादरला असून दरवाजाजवळच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. सतत सुरू असलेल्या ब्लास्टिंग प्रक्रियेने टेंभुर्ली-मांजरे गावचा परिसर हादरून गेला आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार काय, असा संतप्त सवाल टेंभुर्ली-मांजरेवासीयांनी केला आहे.
शहापूर तालुक्यातील डोळखांबजवळील टेंभुर्ली आणि मांजरे गाव येथे ब्लास्टिंगचे काम सुरू आहे. या ब्लास्टिंगच्या हादऱ्यांमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण भयभीत झाले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. टेंभुर्ली व मांजरे गावालगत गेल्या अनेक दिवसांपासून स्टोन क्रशर व दगडखाणीसाठी ब्लास्टिंगचे काम सुरू आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. पण त्याची फारशी दखल घेण्यात आली नाही.
टेंभुर्ली येथील ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर तलाठी रणदिवे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. तसेच पंचनामेही केले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती नुकसानभरपाईची.
काही ठिकाणी पंचनामे केले असले तरी अजूनपर्यंत प्रत्यक्षात कारवाई न झाल्याने डोळखांब येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कोणत्याही क्षणी त्यांच्या संतापाचा स्फोट होण्याची शक्यता आहे.
घरांना व भिंतींना पडलेले तडे हे ब्लास्टिंगमुळेच झाले की अन्य काही कारणांमुळे याचा तपास करण्यात येणार आहे. प्रशासनाने स्वतंत्र तांत्रिक तपास करून स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
त्वरित नुकसानभरपाई द्या !
टेंभुर्ली-मांजरे परिसरातील ज्या भागात भिंतींना तडे गेले आहेत त्याचे पंचनामेदेखील झाले आहेत. पण प्रत्यक्षात त्वरित नुकसानभरपाई देण्यासाठी पावले उचला, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


























































