
>> अजय गायकवाड
कर्जत तालुक्यातील खांडस येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पती एकनाथ ऐनकर याला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. दारूच्या नशेत लाकडी काठीने केलेल्या या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करून तब्बल 58 टाके घालावे लागले, तर पायाचे हाडही मोडले. नेरळ येथील युनिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले.
रात्री घराचा दरवाजा उघडण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. डोके, हात, डोळा आणि पायावर झालेल्या मारहाणीत महिला बेशुद्ध पडली. यानंतर महिला नेरळ येथे उपचारासाठी दाखल केले, तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या असून ती या हल्ल्यातून थोडक्यात बचावली.
विशेष म्हणजे, सुरुवातीला महिला पायरीवरून घसरून पडल्याचे सांगण्यात आले; मात्र जखमांचे स्वरूप पाहून युनिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना संशय आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान आरोपी पती विरोधात नेरळ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पती एकनाथ ऐनकरला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काजरोळकर करीत आहेत.



























































