
उल्हासनगरात आज मोठी जीवितहानी टळली. कॅम्प नंबर 3 मधील ‘शिवगंगा पार्क’ या इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. या जबदरस्त हादऱ्याने चौथ्या मजल्याचा स्लॅबही तिसऱ्या मजल्यावर कोसळल्याने रहिवाशांची अक्षरशः पळापळ झाली. अनेकांनी जीवाच्या आकांताने इमारतीबाहेर पळ काढला. याबाबत माहिती मिळताच पालिकेच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेत 17 कुटुंबांची सुखरूप सुटका केली.
उल्हासनगर कॅम्प नं-3 मधील पंजाबी कॉलनी येथील ‘शिवगंगा पार्क’ ही इमारत सन 1996 मध्ये बांधण्यात आली होती. या 5 मजली इमारतीत एकूण 37 फ्लॅट्स आणि तळमजल्यावर काही दुकाने आहेत. मंगळवारी सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास अचानक पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर आणि पाठोपाठ चौथ्या मजल्यावरील स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला. स्लॅब कोसळल्याचा मोठा आवाज झाल्यामुळे इमारतीमधील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली. ज्यावेळी हा स्लॅब कोसळला त्यावेळी संबंधित फ्लॅट्समध्ये नागरिक उपस्थित होते, मात्र दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली.
धोकादायक इमारतीचा यादीत समावेश नाही
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व रहिवाशांची सुखरूप सुटका करून प्रशासनाने इमारत सील केली. तसेच या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीला महापालिकेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; मात्र ही इमारत पालिकेच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट नव्हती.


























































