
सॅन फ्रान्सिस्कोमधील OpenAI च्या एका कार्यालयात रेकॉर्डिंग डिव्हाइस बसवल्याच्या आरोपावरून कंपनीच्या एका सौदी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अब्दुल रहमान अल्फोजान असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला 9 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी फेडरल न्यायालयात हजर करण्यात आले, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने सांगितले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्याच्या अखेरीस OpenAI च्या सुरक्षा पथकाला हे डिव्हाइस सापडले. कंपनीच्या कार्यालयात हे रेकॉर्डिंग उपकरण सापडल्यानंतर त्याचा सोर्स शोधण्यासाठी आणि त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी AI मॉडेल्सचा वापर केल्याचे OpenAI ने सांगितले.
अब्दुल रहमान अल्फोजान हा अमेरिकेचा कायमस्वरूपी रहिवासी आहे. तो जुलै 2025 पासून OpenAI मध्ये कार्यरत होता. 30 सप्टेंबर रोजी ‘काउंटर-सर्व्हिलन्स स्वीप’ दरम्यान कर्मचाऱ्यांना अंगठ्याच्या आकाराचे हे उपकरण सापडले. हे उपकरण टॉयलेट पेपरमध्ये लपवून कॉन्फरन्स रूममधील टीव्हीच्या मागील बाजूस असलेल्या यूएसबी पोर्टमध्ये बसवण्यात आले होते. या उपकरणात मायक्रोफोन, काढता येण्याजोगा कॅमेरा सेन्सर आणि मायक्रो-एसडी (microSD) स्टोरेज असल्याची माहिती मिळते.
कॉन्फरन्स रूममध्ये होणाऱ्या मिटिंगमध्ये सहभागी होण्याची परवानगी नसतासा अल्फोजान तेथे अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाला होता. निवेदनानुसार, त्याने OpenAI च्या कार्यालयीन इमारती, मीटिंग रूम्स, कॅलेंडर्स, वेळापत्रके आणि लोकांचे स्थान याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी एका ‘प्रोडक्टिव्हिटी टूल’चा वापर केला.
सध्या तरी, या व्यक्तीने ‘मॉडेल वेट्स’ (model weights), सोर्स कोड किंवा ग्राहकांचा डेटा अयोग्यरित्या मिळवल्याचे किंवा बाहेर पाठवल्याचे कोणतेही संकेत आम्हाला मिळालेले नाहीत, असे ‘ओपनएआय’ने निवेदनात म्हटले आहे. न्याय विभागाच्या माहितीनुसार, ‘ओपनएआय’च्या सुरक्षा पथकाला अल्फोजानची एक बेवारस बॅग तपासताना दुसरे उपकरण सापडले.


























































