
प्रवाशाच्या चेक-इन सामानात पॉवर बँक आढळल्याने हैदराबादहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे विमान माघारी बोलावण्यात आले. यानंतर विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी दुपारी ही घटना घडली. संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षा प्रक्रिया राबवण्यात आली.
इंडिगोचे 6E 6409 हे विमान बुधवारी दुपारी 12.15 वाजता हैदराबादहून श्रीनगरला उड्डाण घेणार होते. विमानात 173 प्रवासी होते. विमान बे 12 वरून मागे सरकले होते आणि धावपट्टीच्या दिशेने जात असतानाच ही माहिती समोर आली. संभाव्य धोका लक्षात घेत विमान धावपट्टीवरून बे वरून पुन्हा 12 वर आणण्यात आले. यानंतर विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली, असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
इंडिगोच्या सामानाविषयक धोरणानुसार, पॉवर बँक्स आणि अतिरिक्त लिथियम बॅटरी केवळ ‘हँड बॅगेज’मध्ये ठेवण्याची परवानगी आहे आणि त्या प्रवाशाच्या हाताशी असायला हव्यात. त्या ‘चेक-इन’ सामानात ठेवता येत नाहीत.
काही दिवसांपूर्वीच, हवेत असताना एका प्रवाशाच्या पॉवर बँकेला आग लागल्यामुळे इंडिगोचे आणखी एक विमान हैदराबादकडे वळवण्यात आले होते; त्यानंतर ही घटना घडली आहे.


























































