
जंतरमंतर येथे अनधिकृत प्रवेश केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले कॉक्रोज जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयाने बुधवारी ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर कॉक्रोज जनता पार्टीने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत ही कारवाई म्हणजे ‘भ्याडपणाचे राजकारण’ असल्याचे म्हटले आहे.
#WATCH | Delhi: Cockroach Janta Party (CJP) Chief Spokesperson Saurav Das and its National Spokesperson Ashutosh Ranka being brought out of Mandir Marg Police Station.
They have been sent to 5-day judicial custody. https://t.co/LIcRzFwutx
— ANI (@ANI) October 14, 2026
पक्षाचे नेते दास, रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील अभिष्ट हेला यांनी न्यायालयीन कोठडीच्या निर्णयावर आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी न्यायालयात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला.
“हे नेते भविष्यात पुन्हा गुन्हा करू शकतात, केवळ पोलिसांच्या या दाव्यावरून त्यांना ५ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. या नेत्यांनी लोकांना जंतरमंतरवर येण्याचे आवाहन केले होते, असा खोटा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. त्यांनी कोणतेही आवाहन केले नव्हते किंवा बाँडचे उल्लंघनही केलेले नाही. कॅनॉट प्लेसशी संबंधित एका वेगळ्या तक्रारीचा आधार घेऊन त्याचा येथे गैरवापर करण्यात आला,” असा युक्तिवाद ॲड. हेला यांनी केला.
‘भारत माता की जय’ म्हटल्यामुळे तुरुंगात पाठवले : अजिंक्य शिंदे
न्यायालयाच्या या निर्णयानंतर सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे यांनी सरकारवर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “सौरव दास, आशुतोष रांका आणि मी स्वतः कार्यकर्त्यांसह जंतरमंतरवर गेलो होतो. तिथे आम्ही फक्त राष्ट्रध्वज फडकवला आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. मोदी-शाह सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत असून केवळ निषेध नोंदवल्यामुळे आमच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे.”
आज आशुतोष रांका यांचा वाढदिवस असल्याचे नमूद करत शिंदे म्हणाले, “आज आशुतोषचा वाढदिवस असताना तिरंगा फडकवल्याबद्दल आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्याबद्दल त्याला वाढदिवसाच्या दिवशीच तुरुंगात पाठवण्यात आले. ही सरकारची दडपशाही आहे.”
“आम्ही झुकणार नाही”
सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून मूलभूत हक्क हिरावून घेणाऱ्या या हुकूमशाही सरकारविरोधात देशभरातील नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन अजिंक्य शिंदे यांनी केले. तसेच ५ दिवसांच्या या कोठडीने आमचे नेते घाबरणार नाहीत, असा इशारा देत ते म्हणाले, “आमच्या नेत्यांना तुरुंगात पाठवून सरकार जर घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. दास आणि रांका हे ताठ मानेने तुरुंगात गेले आहेत आणि आम्ही या लढ्यापासून मागे हटणार नाही.”




























































