काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब? थेट PMOकडे तक्रार, मंदिर प्रशासनाने आरोप फेटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानचोरी प्रकरण समोर आलेले असताना आता वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब झाल्याची शंका एका वकीलाने व्यक्त केली आहे. या वकिलाने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली आहे. तसेच इतरही ठिकाणी ही तक्रार नोंदवली आहे. मंदिराच्या कळसावरून जवळपास ८ ते १० भागांमधील सोने गायब असून या प्रकरणी न्यायालीन चौकशीसह श्वेतपत्रिका काढण्याची मागणी तक्रारदार वकिलाने केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. तर मंदिर प्रशासनाने सोने गायब झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

मंदिरात दर्शनासाठी आलेले आणि व्यवसायाने वकील असलेले नित्यानंद राय यांनी मंदिराच्या कळसावर काही ठिकाणी सोन्याच्या प्लेट गायब असल्याची शंका व्यक्त केली. यासंदर्भात राय यांनी मंदिर प्रशासन, मुख्यमंत्री कार्यालय, पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली आहे. मंदिराच्या कळसावरील काही भागातून सोने गायब झालेले दिसत आहे आणि त्याची व्याप्ती वाढत आहे, असा दावा तक्रारदार वकील राय यांनी केला आहे. तर मंदिर प्रशासनाने आरोप फेटाळून लावत सोने सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. ‘आज तक’ने हे वृत्त दिले आहे.

सप्टेंबर २०२६ मध्ये नित्यदर्शनासाठी मंदिरात आले होते. यावेळी त्यांचे लक्ष सोन्याने मढवलेल्या कळसावर गेले. तेव्हा ८ ते १० ठिकाणांवरील सोने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी २३ सप्टेंबर २०२६ ला मंदिर प्रशासन, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि मंदिर न्यासाच्या सर्व विश्वस्थांना आणि रजिस्ट्रारकडे तक्रार केली. तसेच कथितरित्या गायब झालेल्या सोन्याचे स्थिती स्पष्ट करणे, संबंधित भाग पुन्हा बसवण्याचे आणि सोने गायब झाल्याच्या स्थितीची माहिती मागितली आहे.

मंदिर प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणी श्वेतपत्रिका काढावा जेणेकरून भाविकांना आणि सामान्यांना वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल. त्यांच्या तक्रारीचे ९ ऑक्टोबरला लेखपालांच्या अहवालाद्वारे निराकरण करण्यात आले आहे. श्री काशी विश्वासनाथ मंदिर न्यास सुवर्ण कळसाच्या देखभाल दुरुस्तीसाठी आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञांच्या संपर्कात आहे. दुस्तीचा उद्देश धार्मिक आणि पुरातत्व महत्त्व कायम ठेवून संरचना दुरुस्त करणे आहे, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, तक्रादार नित्यानंद राय त्याने समाधानी नाहीत. त्यांनी आपली तक्रार कायम ठेवली आहे.

सोन्याची गुणवत्ता आणि तपासावर प्रश्नचिन्ह

तक्रादार नित्यानंद राय यांनी २३ सप्टेंबरला नव्याने तक्रार केली आहे. कळसावरील पूर्वभागात कथितरित्या सोने गायब होण्याचे क्षेत्र वाढत आहे. तिथून सतत सोने काढले जात आहे, अशी शंका तक्रारदाराने व्यक्त केली आहे. यासोबतच २०२२ मध्ये दानशूरांकडून दिल्या गेलेल्या सोन्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावेळी कळसावर १० फूट सोन्याच्या प्लेट लावण्यात आल्या होत्या. गर्भगृहातही सोन्याच्या प्लेट लावण्यात आल्या होत्या. दानशूरांनी ज्या कॅरेटचे सोने दान केले होते त्याच गुणवत्तेचे सोने मंदिरात बसवले आहे का? असा प्रश्नही तक्रारदार नित्यानंद राय यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणी मंदिर न्यासातील सर्व विश्वस्थांची तत्काळ बैठक घेऊन उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही तक्रारदार नित्यानंद राय यांनी केली आहे.