
दिल्ली पोलिसांचा क्रूर आणि अमानुष चेहरा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज देशापुढे आणला. भ्रष्ट निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करताना पोलिसी अत्याचाराचा बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी थेट मीडियासमोर उभे केले आणि मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली.
देशाचे घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीसह देशभर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. महिला पोलिसाने गळा दाबलेली रितू बलारा हिच्यासह अन्य पीडित विद्यार्थ्यांनी बुधवारी 10, जनपथ येथे राहुल गांधींची भेट घेतली. राहुल यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना धीर दिला. विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर राहुल यांनी मोदी-शहांवर हल्ला चढवला. ‘हे आमचे सिंह आणि सिंहिणी आहेत. मोदी-शहांनी यांना नीट पाहून घ्यावे. हे सगळे एकजूट आहेत. हा हिंदुस्थान आहे. हे विद्यार्थी हिंदुस्थानचा आवाज आहेत. मोदी आणि शहांनी यांच्या वाटेत येऊ नये. बाजूला व्हावे, असे राहुल यांनी ठणकावले.
व्हिडीओ बनवा, पुरावे तयार करा!
राहुल गांधी यांनी यावेळी पोलिसांनाही इशारा दिला. ‘प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही पोलिसांच्या मारहाणीचे फोटो, व्हिडीओ रेकॉर्ड करायला आणि पुरावे जमवून आमच्याकडे पाठवायला सांगितले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळवून दिला जाईल. मुलांवर हात उचलणाऱ्या प्रत्येकाला अद्दल घडवली जाईल. मोदी, शहा, ज्ञानेश कुमारपासून ते पोलीस शिपायापर्यंत प्रत्येकाला शिक्षा दिली जाईल,’ असे राहुल यांनी ठणकावले.
चंचल यादव यांना निलंबित करा!
दिल्ली पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल चंचल यादव यांनी एनएसयूआयची कार्यकर्ता रितू बलारा हिला केलेल्या अमानुष मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही हा व्हिडिओ शेअर करत चंचल यादव यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी केली. पोलिसांच्या या अत्याचाराबद्दल अमित शहा यांनी माफी मागावी, असेही त्यांनी नमूद केले.
‘पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदा फोन हिसकावून घेतले. त्यातले व्हिडीओ तपासले आणि डिलीट केले. काही लोकांचे फोन परत केले नाहीत. मोठय़ा संख्येने महिला आंदोलक असतानाही अनेक ठिकाणी महिला पोलीस नव्हत्या, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. धर्मेंद्र नावाच्या विद्यार्थ्यांला उल्टी येईपर्यंत मारहाण करण्यात आली. बोलवा तुमच्या नेत्याला, बघू कोण येते ते, अशा धमक्याही देण्यात आल्या.
प्रायव्हेट पार्टस्वर लाथा घातल्या, ठोसे लगावले, गळा दाबला!
विद्यार्थ्यांनी यावेळी मीडियासमोर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. एनएसयूआयची कार्यकर्ता रितू बलारा हिने महिला कॉन्स्टेबल चंचल यादव हिने केलेल्या मारहाणीबद्दल सांगितले. चंचल यादव यांनी आमचे आंदोलन चिरडण्यासाठी सगळी ताकद लावली. त्यांनी मला मारहाण केली. गळा दाबला. केसाला धरून फरपटत नेले. चेहरा नखांनी ओरबाडला. कानफटात मारली. पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. हे सगळे केल्यानंतर काही झालेच नसल्याप्रमाणे निघून गेली. मला टार्गेट करण्याच्या प्रयत्नात चंचल यादव यांनी माझ्या सहकारी मैत्रिणीलाही बेदम मारहाण केली. छातीवर, पाठीवर, प्रायव्हेट पार्टस्वर लाथा घातल्या, असे रितू बलार हिने सांगितले. इतर विद्यार्थ्यांनीही त्यांच्यावरील अत्याचाराचे वर्णन केले.
इंडिया आघाडीच्या याचिकेवर आज सुनावणी
निवडणूक आयोगाचे अनेक निर्णय आणि एसआयआर स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या इंडिया आघाडीने केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल.



























































