
दुष्काळामुळे होरपळलेल्या मराठवाडय़ातील शेतकरी दोन वेळचे अन्न मिळेल की नाही या विवंचनेत असतानाही सरकार तातडीने मदत देण्यास तयार नाही. उलट दिवाळीपूर्वी फक्त पाच हजार रुपये आणि तेसुद्धा ऍडव्हान्स देण्याची घोषणा करून सरकारने आज शेतकऱ्यांची थट्टा केली. हेक्टरी एक लाख रुपये मदत सरसकट देण्यात यावी अशी मागणी होत असताना शेतकऱ्यांसमोर पाच हजार रुपये तुकडय़ासारखे फेकण्यासारखा हा प्रकार असल्याची टीका होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल माहिती दिली. दुष्काळी मदतीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष निधी येण्यास डिसेंबर उजाडेल. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून त्यांच्या बँक खात्यांमध्ये पाच हजार रुपयांचा निधी आगाऊ म्हणून वर्ग करण्याचा निर्णय घेतला गेल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 39 तालुक्यांचा समावेश
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 39 नव्या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, मात्र काही तालुक्यांमधून आलेल्या निवेदनानंतर फेरआढावा घेण्यात आला. त्यानंतर 39 तालुक्यांची नव्याने भर घालण्यात आली. आता एकूण 304 तालुके राज्यात दुष्काळग्रस्त आहेत. एकूण 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.
90 दिवस पुरेल इतकाच चारा
राज्यात काही भागात 90 दिवस तर काही भागांमध्ये 6-7 महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे. चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी आणि चारा पिकांची लागवड करावी असे आवाहन सरकारने केले आहे. शेतकऱ्यांचा सर्व चारा सरकारने हमीभावाने खरेदी करावा, असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई
मराठवाडय़ातील भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अवैधपणे पाण्याचा उपसा होऊ लागल्याच्याही तक्रारी आहेत. त्याची गंभीर दखल घेत 16 हजार अवैध उपसा जोडण्या तोडण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना सरसकट फी माफी
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफी सरसकट लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. जिल्हा सहकारी बँका, विविध कार्यकारी सोसायटय़ा आणि पतसंस्थांना सक्तीची कर्जवसुली न करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.


























































