
कलाकारांच्या मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे ‘पु.ल. कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत ‘कलाकाराच्या मनात डोकावताना’ या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे असलेल्या अकादमीच्या पाचव्या मजल्यावरील नवीन लघुनाटय़गृहात हा कार्यक्रम होईल.
या संवादात अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषीकेश जोशी तसेच समुपदेशक प्राजक्ता गांगल सहभागी होणार आहेत. प्रकाशझोतात वावरणाऱया कलाकारांच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष, कलाक्षेत्रातील व्यक्तींना भेडसावणाऱया मानसिक आरोग्याच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी या संवादातून मार्गदर्शन केले जाणार आहे. जागतिक मानसिक आरोग्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला कला क्षेत्रातील व्यक्तींनी आणि रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.
वेगळ्या विषयावरील या कार्यक्रमाला रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे आणि प्रसिद्धीच्या झगमगाटात वावरताना सेलिब्रिटींच्या मनात नेमके काय सुरू असते याचा अनुभव घ्यावा.






























































