आयडीबीआय बँक कॅनडातील कंपनीला विकणार; सरकार आणि एलआयसीचा 60 टक्के हिस्सा जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकार आणि एलआयसी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयडीबीआय बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकणार आहे. या विक्रीला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधारी मंजुरी दिली आहे. कॅनडामधील ‘फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स’कंपनीसोबत तब्बल 52 हजार 878 कोटींचा करार झाला आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

फेअरफॅक्स होल्डिंग्सचा हा खरेदीचा व्यवहार भारतीय वित्तीय क्षेत्राच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) व्यवहार ठरणार आहे. सध्या सरकार आणि एलआयसीकडे आयडीबीआय बँकेचा 94.71 टक्के हिस्सा आहे. या करारानंतर फेअरफॅक्स फायनान्शियल कंपनीकडे सर्वाधिक 60.72 टक्के भागीदारी असणार आहे. या व्यवहारानंतर केंद्र सरकार आणि एलआयसीकडे संयुक्तपणे केवळ 34 टक्के भागीदारी कायम राहणार आहे. आयडीबीआय बँक विकत घेण्यासाठी 52,878 कोटींची बोली लावणाऱ्या फेअरफॅक्स या कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ प्रेम वत्स आहेत.