मतमोजणीचे रेकॉर्ड गहाळ होऊच कसे शकते? सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election-commission-letter-to-sunetra-pawar-ncp-constitution-amendment-documents-issue

कर्नाटकातील श्रृंगेरी मतदारसंघातीलमतमोजणीचे व्हिडीओ रेकॉर्ड गहाळ झाल्याचे सांगणाऱ्या निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने आज फटकारले. ‘तुमचे कामच निवडणुका घेणे हे आहे. असे असताना मतमोजणीचे रेकॉर्ड गहाळ झाले असे तुम्ही म्हणूच कसे शकता? असली तकलादू कारणे चालणार नाहीत. जे काही पुरावे आहेत ते सादर करा. अन्यथा आम्हाला प्रतिकूल निष्कर्ष काढावा लागेल,’ असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिला.

फेरमतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव

काँग्रेसचे टी. जी. राजेगौडा यांनी 2023 मध्ये भाजपच्या डी. एन. जीवराज यांच्यावर 201 मतांनी निसटता विजय मिळवला होता. जीवराज यांनी या निकालास हायकोर्टात आव्हान दिले होते. कोर्टाने पोस्टल मतांच्या फेरमोजणीचे व रद्द झालेल्या पोस्टल मतांच्या फेरतपासणीचे आदेश दिले. त्यात जीवराज यांना विजयी घोषित केले. त्यानंतर राजेगौडा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

पुढील सुनावणी पुढच्या वर्षी

न्या. संजय कुमार आणि संजीव सचदेवा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी मतमोजणीच्या रेकार्डिंगचा मुद्दा समोर आला. त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला. पुढील सुनावणी पुढच्या वर्षी 15 फेब्रुवारीला होणार आहे.

निवडणुकीचे रेकॉर्ड ठेवणे ही तुमची जबाबदारीच आहे. शोध घेण्याचा प्रश्न येतोच कुठे? निवडून आलेल्या उमेदवाराला दिलेल्या  नोंदी तुमच्याकडेच नाहीत, असं कसं? तुमच्याकडं जे काही असेल, ते पुढील तारखेला सादर करा. – कोर्ट