चहा पीत बसलेल्यावर सशस्त्र हल्ला; डावा हात तुटला! जामखेडमध्ये थरार; नागरिकांमध्ये भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामखेड शहरात एकावर सत्तूराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीती पसरली आहे. राहुल अंधारे असे हल्ला झालेल्याचे नाव आहे. अंधारे ‘पुढारी वड टी’ सेंटर येथे चहा पित बसले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी तोंड बांधलेल्या दोघांनी हॉटेलमध्ये घुसून त्यांच्यावर सत्तूराने वार केले. या हल्ल्यात अंधारे यांचा डावा हात गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले.

बुधवारी (दि. १४) सायंकाळी राहुल अंधारे हे ‘पुढारी वड टी’ सेंटर येथे चहा पित बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून तिघेजण तिथे आले. त्यापैकी तोंड बांधलेल्या दोघांच्या हातात सत्तूर होते. या दोघांनी हॉटेलमध्ये जाऊन अंधारे यांच्यावर वार केले. अचानक हल्ला झाल्याने हॉटेलमधील नागरिकांमध्ये घबराट पसरली. हल्ल्यादरम्यान अंधारे यांच्या जखमांमधून उडालेले रक्त शेजारी बसलेल्या लोकांवरही उडाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

प्राथमिक उपचारांनंतर अहिल्यानगरला हलवले

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल अंधारे यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

कलाकेंद्रातील वादाची पार्श्वभूमी?

राहुल अंधारे यांच्याशी संबंधित कलाकेंद्रातील गोंधळाच्या प्रकरणात सुमारे महिन्याभरापूर्वी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी कलाकेंद्रावरून वाद झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सदर हल्ला झाला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.