
पाटण शहरातून वाहणाऱ्या केरा नदीपात्रात मोठय़ा प्रमाणावर मृत मासे आढळून येत असल्याने नदीच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात कचरा, मांसाहारी पदार्थांचे अवशेष आणि हॉटेलमधील टाकाऊ अन्न टाकले जात असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाटण शहरातील केरा पुलावरून रात्रीच्या वेळी मटण, चिकन, मासे यांचे अवशेष तसेच घरगुती कचरा नदीपात्रात टाकला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या प्रकारामुळे नदीपात्रात घाण साचत असून, पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीत ठिकठिकाणी मृत मासे आढळत असल्याने जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. एकीकडे स्वच्छ आणि सुंदर पाटणचा संकल्प केला जात असताना शहरातून वाहणाऱ्या नदीची अशी अवस्था होणे चिंताजनक आहे. नदीपात्रातील प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, दुर्गंधीमुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, माशांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नगरपंचायत प्रशासनाने केरा नदीपात्राची तातडीने स्वच्छता करावी, प्रदूषणाचे स्रोत शोधावेत आणि नदीत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


























































