
अरुणाचल प्रदेश हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याचे वास्तव नाकारण्याचा चीनचा खोडसाळपणा पुन्हा एकदा हिंदुस्थानी खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या आड आला आहे. चीनमधील निंगबो येथे 24 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात निवड झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या चारू पेसीला चीनकडून नत्थी व्हिसा देण्याची तयारी दर्शवण्यात आली, मात्र हिंदुस्थानी सरकार असा व्हिसा स्वीकारत नसल्याने हिंदुस्थानी वेटलिफ्टिंग महासंघाने त्यासाठी हमीपत्र देण्यास नकार दिला. परिणामी, चारूला या जागतिक स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
चीनच्या या भूमिकेमुळे एका खेळाडूची मोठी आंतरराष्ट्रीय संधी हिरावली गेली आहे. चारू पेसी हा 65 किलो वजनी गटात सहभागी होणार होता. हिंदुस्थानी संघात ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिच्यासह आठ खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या व्हिसाची प्रक्रिया सुरू असताना बुधवारी चारूच्या व्हिसाचा प्रश्न समोर आला. व्हिसा सुविधा सेवा केंद्राने (व्हीएफएस) चारूला नत्थी व्हिसा दिल्यास तो स्वीकारण्याबाबत हिंदुस्थानी वेटलिफ्टिंग महासंघाकडून हमीपत्र मागितले, मात्र हिंदुस्थान सरकारची भूमिका स्पष्ट असल्याने महासंघाने अशी हमी देण्यास नकार दिला. त्यामुळे चारूला स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
चीनची जुनीच खोड! खेळाडूंना पुन्हा फटका
अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना नत्थी व्हिसा देण्याचा चीनचा हा पहिलाच प्रकार नाही. 2023 मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळीदेखील अरुणाचल प्रदेशातील दोन वुशू खेळाडूंना नत्थी व्हिसा देण्यात आला होता.




























































