
मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या (एमएसएसए) हॅरिस शील्ड एलिट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत एज्युकेशन अकादमीने शम्सुद्दीन मनसेबदार आणि गोलू पाल यांच्या गोलंदाजीच्या जोरावर पराग इंग्लिश शाळेचा अवघ्या 67 धावांत धुव्वा उडवला. तसेच अद्वित तिवारीच्या शतकाच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने 9 बाद 274 अशी दमदार मजल मारली.
शम्सुद्दीनने आपल्या डावखुऱ्या मध्यमगती गोलंदाजीवर अवघ्या 42 धावांत सात विकेट घेत पराग इंग्लिश स्कूलला 67 धावांत गुंडाळले आणि प्रत्युत्तरात जनरल एज्युकेशन अकादमीने धावांचा वेग वाढवत 219 धावांपर्यंत मजल मारली. शार्दुल फागरेने 112 चेंडूंत 98 धावांची नाबाद खेळी केली. वीरन अटोलेसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी रचली. स्पर्श घोलपनेही 58, तर वीरनने 53 धावा केल्या.


























































