
मालदीवच्या तटरक्षक दलाने तमिळनाडूतील २५ मच्छीमारांना त्यांच्या तीन बोटींसह ताब्यात घेतल्याची माहिती मुख्यमंत्री विजय यांनी गुरुवारी केंद्र सरकारला दिली. तसेच, या मच्छीमारांची सुटका करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून विजय यांनी सांगितले की, तुतिकोरिन जिल्ह्यातील या मच्छीमारांना मंगळवारी पहाटे मालदीवच्या तटरक्षक दलाने ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या तीन यांत्रिक बोटीही जप्त करण्यात आल्या.
विजय यांनी जयशंकर यांना सांगितले की, ‘मालदीव सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करावा आणि मच्छीमारांची तसेच त्यांच्या बोटींची लवकरात लवकर सुटका करून त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी माझी आपणास विनंती आहे’.
परराष्ट्रमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी करताना विजय यांनी सांगितले की, त्यामुळे प्रभावित मच्छीमारांच्या कुटुंबीयांना आणि संपूर्ण मच्छीमार समुदायाला मोठा दिलासा मिळेल.



























































