जव्हार, मोखाडा, तलासरी तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; सरकारला अखेर जाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाअभावी पालघर जिल्ह्यातील भातशेती अक्षरशः करपली आहे. मात्र इतकी भयंकर परिस्थिती असताना गाढ झोपेत असलेल्या सरकारला अखेर जाग आली असून जव्हार, मोखाडा, तलासरी हे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामुळे अस्मानी संकटाचा तडाखा बसलेल्या या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अल निनो वादळाचा मोठा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी शासनाने प्रथमदर्शनी २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले होते. मात्र त्यामध्ये आदिवासी पालघर जिल्ह्यातील एकाही तालुक्याला स्थान दिलेले नव्हते. पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली असली तरी परतीच्या पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपली आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठवत पालघर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली होती. अखेर पाझर फुटलेल्या सरकारने जव्हार, मोखाडा, तलासरी या तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे.

जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, तलासरी हे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केल्याने येथील शेतकऱ्यांना अनेक सवलती मिळणार आहेत. यामध्ये तत्काळ आर्थिक मदत, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्ज वसुलीस स्थगिती, जमीन महसुलात सूट तसेच वीज व शिक्षणात सवलतीत दिल्या जातात. मात्र सरकारने दुष्काळग्रस्तांच्या या सवलती कागदावर न ठेवता त्याचा लाभ द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.