चेंबूरमध्ये बेस्ट बसला टँकरची धडक; चार प्रवाशी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील पंत्राटी बसच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास चेंबूर-छेडा नगर येथे बेस्ट बसला अपघात झाला. सिग्नलजवळ अचानक मोटरसायकल समोर आल्यामुळे बेस्टच्या चालकाने तातडीचा ब्रेक लावून बस थांबवली. याच वेळी मुंबईकडून वाशीच्या दिशेने जाणाऱया टँकरने बसच्या उजव्या बाजूच्या मध्यभागावर जोरदार धडक दिली. यात बसच्या उजव्या बाजूच्या खिडक्यांच्या तीन काचा फुटून चार प्रवाशी जखमी झाले. जखमींमध्ये दोन मुलींचा समावेश होता.

अपघातग्रस्त बस मुलुंड आगारातील वेटलीजची होती. ही बस वैशाली नगरहून माहुलच्या दिशेने जात होती. छेडा नगर परिसरात बसला अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या चार प्रवाशांपैकी दोन महिला प्रवाशांना बस वाहकाने राजावाडी रुग्णालयात नेले. किरकोळ दुखापत झालेल्या एका प्रवाशाने रुग्णालयातील उपचाराला नकार दिला, तर दुसऱया जखमी प्रवाशाला नातेवाईकांनी दुसऱया रुग्णालयात नेले. याचदरम्यान पोलिसांनी पुढील तपासासाठी दोन्ही वाहने टिळक नगर पोलीस ठाण्यात नेली. बसच्या काचा फुटल्यामुळे भाग्यश्री खेडकर या 14 वर्षीय मुलीच्या उजव्या डोळ्याखाली दुखापत झाली, तर 22 वर्षीय अदिती कोयंडे हिच्या उजव्या कोपराला आणि उजव्या पायाला काचेमुळे दुखापत होऊन रक्तस्राव झाला. अन्य दोन जखमी प्रवाशांची नावे समजू शकलेली नाहीत. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या टॅंकरचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.