ऐन उकाड्यात पावसाची बातमी! चार दिवस काही जिह्यांत पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्टोबर हीटने नागरिकांचा घामटा निघत असताना हवामान खात्याने चांगली बातमी दिली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने 15 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, पुणे, धाराशीव आणि सोलापूर जिह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मुंबई-ठाण्यात मात्र पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

एल निनोच्या प्रभावामुळे या वर्षी राज्यातील अनेक भागात पावसाने वार्षिक सरासरीदेखील गाठली नसल्याने दुष्काळाचे संकट ओढावले आहे. यातच मान्सूननेदेखील काढता पाय घेतल्याने संकट गडद झाले आहे. असे असतानाच राज्यातील काही ठिकाणी पावसासाठी आता पोषक स्थिती निर्माण झाल्याने चार दिवस संबंधित ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, धाराशीव, लातूर आणि नांदेडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी वादळी पावसाची शक्यता आहे, तर 18 ऑक्टोबर रोजी गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशीव, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे.

यलो अलर्ट जारी

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पडणारा पाऊस वादळी आणि ढगांच्या कडकडाटासह होणार आहे. त्यामुळे संबंधित भागांसाठी हवामान विभागाने संबंधित जिह्यांना खबरदारीचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा परिसरासाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही, तर ठाण्यात मात्र 16 ऑक्टोबर रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.