
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे ठिकाण असलेल्या मुंबई सेंट्रल येथील आगारात सध्या चालक-वाहकांवर अतिरिक्त कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. परिवहन मंत्र्यांच्या मर्जीखातर बसफेऱ्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. चालक-वाहकांचे कमी मनुष्यबळ असतानाही मुंबईहून नवी मुंबई विमानतळासाठी विशेष बसफेऱ्या चालवल्या जात आहेत. वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यासाठी चालकांना पुरेशी विश्रांती घेऊ न देताच डबल ड्युटी लावली जात आहे. त्यामुळे कामगार वर्गात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई आगारातून एसटीच्या शिवशाही, आंतरराज्य, सेमी लक्झरी आदी बसफेऱया चालवल्या जातात. दिवसभरात 47 गाड्यांच्या 106 बसफेऱ्यांद्वारे प्रवाशी सेवा दिली जाते. यामध्ये बेळगाव, जामखंडी, विजापूर, हुबळी अशा आंतरराज्य गाड्यांचा समावेश आहे. अलीकडेच मुंबई आगारातील बसफेऱ्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून मनुष्यबळ तितकेच असल्याने चालक-वाहकांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या चालवणाऱ्या चालक-वाहकांना त्याच गाड्या रिटर्न आणण्याची ड्युटी लावली जात आहे. विश्रांती न घेता डबल ड्युटी करणे भाग पडत असल्यामुळे चालक-वाहकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. अनेकदा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. तसेच हक्काच्या रजा घेण्यास अधिकाऱ्यांकडून मनाई केली जात असल्याचे मुंबई आगारातील चालक-वाहकांचे म्हणणे आहे. परिवहन मंत्र्यांची मर्जी राखण्यासाठी बसफेऱ्यांचे प्रमाण वाढवून चालक-वाहकांची पिळवणूक सुरू असल्याची नाराजी कामगारांमधून व्यक्त केली जात आहे. या प्रकाराची चौकशी वरिष्ठ कार्यालयामार्फत करण्यात यावी, अशी मागणी एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केली आहे.
डय़ुटीवरील कर्मचाऱयांच्या वैद्यकीय मदतीकडे दुर्लक्ष
कामाच्या अतिताणामुळे एसटी कर्मचारी ड्युटीवर आजारी पडण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अशा प्रसंगी पाळीप्रमुखांनी संबंधित कर्मचाऱ्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक असते. मात्र आगारातील पाळीप्रमुख कर्मचाऱयांना वैद्यकीय मदत पुरवण्याकामीही दुर्लक्ष करीत असल्याचे चालक-वाहकांकडून सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली.































































