
टीम इंडियाने पुन्हा एकदा शे होपपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळेच वेस्ट इंडीजला विजयासह मालिकेत बरोबरी साधता आली. होपच्या चौथ्या टी-20 सामन्यातील धडाकेबाज शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने 247 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 223 धावांपर्यंत मजल मारता आली आणि वेस्ट इंडीजने 24 धावांनी सामना जिंकला. या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या वाढदिवशी संघावर पराभवाची नामुष्की ओढवली.
वेस्ट इंडीजच्या 248 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने संघाला दणक्यात सुरुवात करून दिली. संजूने 23 चेंडूंत 6 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 56 धावांची खेळी साकारली. पण संजू बाद झाल्यावर टीम इंडियाच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि त्यांच्यावर सामना गमावण्याची वेळ आली.
तत्पूर्वी, शे होपने दणकेबाज फटकेबाजी करत टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले होते. होप हा एकटाच टीम इंडियाच्या गोलंदाजांवर भारी पडला. अर्धशतक झळकावल्यावर होपने जलदगतीने शतकाच्या दिशेने कूच केली. अखेरच्या दोन चेंडूंमध्ये त्याला शतकासाठी 10 धावा हव्या होत्या. या अखेरच्या दोन्ही चेंडूंवर षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. होपने या सामन्यात 50 चेंडूंत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या जोरावर नाबाद 102 धावांची तुफानी खेळी साकारली. टीम इंडियाच्या मयांक यादव आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी 52 धावा दिल्या.





























































