
येथील रेल्वे स्थानक परिसरात आज रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. हरेश गजवानी असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून या घटनेमुळे उल्हासनगरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ रात्री साडेआठच्या सुमारास अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड हादरले. अनेकजण भीतीने पळून देखील गेले. या गोळीबारात हरेश गजवानी हे जखमी होऊन खाली कोसळले. त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
उल्हासनगर रेल्वे स्थानकाचा परिसर हा सतत गजबजलेला असतो. रात्री उशिरा कामावरून घरी जाणाऱया प्रवाशांचीही तेथे गर्दी असते. त्याच वेळी गोळीबाराची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळू असे सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर आवताडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी सांगितले.































































