
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठय़ाचा विषय चांगलाच पेटला. टँकर माफियांच्या मनमानी कारभाराविरोधात राळ उठवत विरोधकांसह सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांनीही टँकर चालकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पालिकेचेच पाणी भरून टँकरचालक सर्वसामान्यांना चार ते पाच हजार रुपयांना विकत असल्याचा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला.
प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेना नगरसेवक यशोधर फणसे म्हणाले, टँकर चालक-मालकांबाबत अनेक तक्रारी असतात. टँकरचे पाण्याचे स्रोत कोणते आणि त्यांच्या पाण्याची गुणवत्ता बघणे गरजेचे आहे. नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी ‘टँकरवाले आपलेच पाणी चोरणार आणि आपल्याला देणार’ या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले.
तर दीपमाला बढे यांनी टँकरद्वारे पाण्यासाठी नागरिकांकडून तीन ते चार हजार रुपये आकारले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला, तर मीनाक्षी पाटणकर यांनी प्रत्येक विभागात किती टँकर लागतात आणि ते कुठून घेतात, याची माहिती देण्याची मागणी केली. एमआयएमचे जमीर कुरेशी व काँग्रेसच्या अजंता यादव यांनी पालिकेने स्वतःचे टँकर न वापरता भाडय़ाने टँकर का घेतले, असा जाब विचारला. तर गणेश खणकर यांनी बांधकाम व्यवसायासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्याची सूचना केली.
पालिका 25 नवीन टँकर खरेदी करणार
या सर्व टीकेनंतर बोलताना महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, सध्या पालिकेकडे 37 टँकर असून 25 नवीन टँकर घेतले जात आहेत. चोरी रोखण्यासाठी ओटीपी आणि जीपीएस यंत्रणा लागू करण्यात आली असून बांधकामासाठीच्या पाणी वापरावर नवीन धोरण आखले जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. प्रशासनाच्या या स्पष्टीकरणानंतर हा प्रस्ताव अखेर मंजूर करण्यात आला.































































