
नालासोपारा पूर्वेतील अचोळे परिसरात इंपिरियल हाईट्स या १४ मजली टॉवरला मध्यरात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला. फाल्गुनी शाह आणि अश्विनी पारकर अशी मृत महिलांची नावे आहेत. आगीनंतर जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ सुरू झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ३० ते ४० रहिवाशांची सुखरूप सुटका केली.
मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता इमारतीच्या दहाव्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग वेगाने पसरल्याने दहाव्या मजल्यासह जवळील आणखी तीन मजल्यांनाही झळ बसली. आगीची माहिती मिळताच इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली तर काही रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी गॅलरीचा आधार घेतला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वसई-विरार तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. या मोहिमेदरम्यान सुमारे ३० ते ४० रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना शेजारील एका सभागृहात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले. मात्र या दुर्घटनेत फाल्गुनी शाह आणि अश्विनी पारकर या दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला.
- आगीमुळे इमारतीतील चार मजल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
- सहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण.
- आगीचे कारण आणि नुकसानीचा तपशील याबाबत तपास सुरू.
- या घटनेमुळे उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
प्रापंचिक साहित्य जळून खाक
आगीची तीव्रता अधिक असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे सहा तास अथक प्रयत्न करावे लागले. अखेर जवानांना आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अन्य प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.































































