
अमेरिकेतील इलिनॉय राज्यात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी अलेक्झांड्रोस पापोराकिस (वय – 19) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून श्वेत वर्चस्ववादी विचारसरणी व्यक्त करणारा जाहीरनामा तसेच हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांविरोधातील हिंसाचाराचे उल्लेख असलेले दस्तऐवज आढळून आले आहेत. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
पापोराकिस हा इलिनॉयमधील पॅलाटाइन परिसरातील रहिवासी आहे. सामूहिक गोळीबाराच्या कटाची माहिती मिळाल्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला अटक करण्यात केली. बुधवारी रोलिंग मेडोज येथील कुक काउंटी न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
माउंट प्रॉस्पेक्ट पोलिसांना एका व्यक्तीकडून पापोराकिसने पाठवलेल्या संशयास्पद इलेक्ट्रॉनिक संदेशांची माहिती मिळाली होती. या संदेशांमध्ये सामूहिक गोळीबाराची योजना स्पष्ट करणारा दस्तऐवज तसेच रायफल, काडतुसे ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॅगझिन्स, शरीराचे संरक्षण करणारे कवच आणि अन्य सामरिक साहित्याची छायाचित्रे असल्याचे तपासात समोर आले. तपासादरम्यान पोलिसांना ‘Why I Fought: A.K.A.: (Aurora shooter’s manifesto)’ या शीर्षकाचा दस्तऐवज आढळला. त्यामध्ये दक्षिण आशियाई वंशाच्या नागरिकांविरोधातील हिंसाचाराचे उल्लेख असल्याचा आरोप आहे. विशेषतः हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांना लक्ष्य करण्यासंदर्भातील मजकूर त्यात असल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.
पॅलाटाइन पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तपासातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पापोराकिस 11 ऑक्टोब रोजी हल्ला करण्याच्या तयारीत असण्याची शक्यता पोलिसांना वाटत होती. अरोरा परिसरातील हिंदू प्रार्थनास्थळाला लक्ष्य केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, हल्ल्यासाठी नेमके कोणते ठिकाण निश्चित करण्यात आले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा तपास सुरू आहे.
STORY | 19-year-old arrested in Illinois for planning attack on Hindu place of worship
A 19-year-old man was arrested for plotting an attack “potentially targeting” a Hindu place of worship in the Aurora area in Illinois, with authorities recovering a manifesto expressing white supremacist ideologies and containing references to violence against people of “Indian descent.”
(Story By Yoshita Singh/PTI)
READ: https://t.co/Zul0DQKb1W
— Press Trust of India (@PTI_News) October 15, 2026
पॅलाटाइन आणि माउंट प्रॉस्पेक्ट पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पापोराकिसला त्याच्या निवासस्थानातून बाहेर पडत असताना ताब्यात घेतले. त्यानंतर घराची झडती घेतली असता एक रायफल, काडतुसांनी भरलेली अनेक मॅगझिन्स, शेकडो काडतुसे आणि सामरिक साहित्य जप्त करण्यात आले. तसेच शरीराचे संरक्षण करणारे कवच असलेले एक जॅकेट आणि श्वेत वर्चस्ववादी अतिरेकी विचारसरणीशी संबंधित प्रतिमा असलेले चिन्हही आढळले.
संभाव्य हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर अरोरा पोलिस विभागाने आपल्या हद्दीतील हिंदू प्रार्थनास्थळांना सतर्क केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचीही मदत घेतली आहे. पापोराकिसवर दहशतवादी धमकी देणे आणि 16 इंचांपेक्षा कमी लांबीची बॅरल असलेली रायफल बेकायदेशीररीत्या बाळगणे, असे प्रत्येकी एक आरोप ठेवण्यात आले आहेत. तपासाच्या आधारे आणखी आरोप ठेवण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



























































