
साखरेच्या किमान विक्री मूल्याच्या (एम.एस.पी.) मागणीसाठी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री तसेच केंद्र सरकारबरोबर झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सलग 31 तास पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यानंतर, प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेऊन, शेतकऱ्यांनी हे महामार्गावरील ठिय्या आंदोलन आता मागे घेतले आहे. पण हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार करत थेट केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानावर धडकण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
आज सकाळी महामार्गावरील चक्काजाम मागे घेतल्यानंतर कर्नाटक राज्य रयत संघाचे प्रमुख चुन्नाप्पा पुजारी यांनी बेळगावाजवळील हत्तरकी टोल नाका येथून केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानावर धडकण्यासाठी शेतकऱ्यांसह पदयात्रा सुरू केली आहे. याच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून महाराष्ट्रातील साखर कारखानदारांविरोधात राजू शेट्टी यांनी मोर्चा वळविला केला आहे. सातारा आणि सांगलीच्या काही कारखानदारांनी घाईघाईने गळीत हंगाम सुरू केल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
गेल्या दोन दिवसांत झालेल्या या आंदोलनात कोगनोळी आणि हत्तरकी टोल नाक्यांवर हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावरच स्वयंपाक करून पंगती बसवल्या होत्या. यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या मैलोनमैल लांब रांगा लागल्या होत्या. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव या चारही जिल्ह्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असली तरी प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
सध्या महामार्गावरील वाहतूक संथ गतीने पूर्ववत होत असली, तरी शेतकऱ्यांची पदयात्रा हुबळीच्या दिशेने कूच करत असल्याने प्रशासनावर आणि केंद्रीय मंत्र्यांवर दबाव वाढला आहे. परिसरातील गावांतून आणलेले व शिल्लक राहिलेले जेवण, भाकरी व पाणी पदयात्रेच्या ठिकाणी पाठविण्यात आले.
उद्या पासून महाराष्ट्रात ‘काटा बंद’ आंदोलन
सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही कारखानदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तसेच ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला घाबरून शेतकऱ्यांच्या दराचा निर्णय न घेताच कारखाने सुरू केल्याचा आरोप करत, या कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी उद्यापासून ‘काटा बंद’ आंदोलन सुरू करण्यात येईल. हे सर्व साखर कारखाने बंद पाडून ऊसतोड रोखली जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच दोन दिवसांनंतर सर्व कार्यकर्ते हुबळी येथील पदयात्रेत सामील होणार असल्याचेही त्यांनी सांगितले





























































