
देशात लवकरच मोबाईलवर येणाऱ्या कॉल्सबाबत मोठा बदल होणार असून, यापुढे फोनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि नंबर थेट स्क्रीनवर दिसणार आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) सर्व टेलिकॉम कंपन्यांना 1 नोव्हेंबर 2026 पासून ‘CNAP’ (Calling Name Presentation) ही सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोबाईलधारकांना आता अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबद्दलची माहिती सहज समजू शकणार आहे.
सध्या ही सुविधा 4G आणि 5G नेटवर्क वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी आपोआप (बाय डीफॉल्ट) सुरू केली जाईल. 2G आणि 3G नेटवर्कवर ही सेवा नंतरच्या टप्प्यात लागू करण्याबाबत विचार केला जाईल. या नवीन व्यवस्थेमुळे स्पॅम कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.
फोन आल्यावर स्क्रीनवर कॉल करणाऱ्याचा नंबर पहिल्या ओळीत दिसेल, तर दुसऱ्या ओळीत त्याचे नाव दिसेल. जर तो नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह असेल, तर तुम्ही सेव्ह केलेले नाव दिसेल. नंबर सेव्ह नसेल, तर टेलिकॉम कंपनीच्या डेटाबेसमधून त्या व्यक्तीचे अधिकृत नाव स्क्रीनवर दिसेल. जर कॉल परदेशातून आला असेल, तर स्क्रीनवर ‘आंतरराष्ट्रीय कॉल’ (International Call) असा मेसेज येईल.
या सुविधेसाठी कंपन्यांना सुरक्षा आणि गोपनीयतेची विशेष काळजी घ्यावी लागेल. कॉल संपल्यानंतर कॉलरचे नाव सेव्ह किंवा स्टोअर केले जाणार नाही. तसेच ज्या युजर्सनी ‘कॉलिंग लाइन आयडेंटिफिकेशन रिस्ट्रिक्शन’ (CLIR) हा पर्याय निवडला आहे, म्हणजेच ज्यांना आपला नंबर गुप्त ठेवायचा आहे, त्यांचे नाव स्क्रीनवर दाखवले जाणार नाही.
व्यावसायिक आणि बल्क कनेक्शन वापरणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या आवडीचे नाव डिस्प्लेवर ठेवण्याचा पर्याय मिळणार आहे. मात्र, त्यासाठी ट्रेडमार्क किंवा जीएसटी (GST) पोर्टलवरील नोंदणीची कागदपत्रे दाखवणे बंधनकारक असेल. टेलिकॉम कंपन्या या कागदपात्रांची पडताळणी करूनच ही नावे अपडेट करतील. TRAI च्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


























































