
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी टीका केली आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून दिल्लीतील विद्यार्थी संघटना आणि तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या आंदोलकांना रस्त्यावरून फरफटत नेले जात असल्याचा आरोप दिपके यांनी केला. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दिपके यांनी विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशातील विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले, तेव्हाही त्यांच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यालाही ताब्यात घेण्यात आले. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि पिनराई विजयन हे रस्त्यावर उतरले असतानाही त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे दिपके यांनी सांगितले. “हे सगळे कोणासाठी? केवळ एका ज्ञानेश कुमार यांच्यासाठी,” असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला.
10 ऑक्टोबर रोजी आंदोलनासाठी देण्यात आलेल्या हाकेनंतर देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचे दिपके यांनी सांगितले. ज्ञानेश कुमार यांच्यासाठी रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. रेल्वे सेवा बंद करूनही सरकारचे समाधान झाले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आणि अनेक मेट्रो स्थानकांवर निर्बंध लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
“रेल्वे बंद करूनही समाधान झाले नाही, म्हणून दिल्लीतील मेट्रो बंद केली आणि मेट्रो स्थानकेही बंद केली. हे सगळे ज्ञानेश कुमार यांच्यासाठी,” असे दिपके म्हणाले.
जम्मू-कश्मीरमधून सुरक्षा दलांना बोलावले
दिल्लीतील आंदोलन हाताळण्यासाठी जम्मू-काश्मीरमधून सुरक्षा दलांना बोलावण्यात आल्याचाही आरोप दिपके यांनी केला. रेल्वे आणि मेट्रो सेवांवरील निर्बंधांनंतरही प्रशासनाने सुरक्षा दलांची मदत घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
दिल्लीतील विद्यार्थी संघटना आणि तरुणांच्या आंदोलनापासून ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेण्यापर्यंतच्या घटनांचा उल्लेख करत दिपके यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.


























































