
राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथील विस्तीर्ण खाडीपात्रात घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक दुर्घटनेत खोल पाण्यात बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय माहिरा जुनेद भाटकर हिचा मृतदेह अखेर पाच दिवसांच्या अखंड शोधमोहिमेनंतर कांदळवनात अडकलेल्या अवस्थेत मिळून आला. एकाच घरातील चार निष्पाप भावंडांचा एकापाठोपाठ असा करुण अंत झाल्यामुळे भाटकर कुटुंबीयांवर आभाळच कोसळले असून संपूर्ण राजापूर तालुक्यासह संपूर्ण कोकण परिसर तीव्र हळहळ आणि दुःखात बुडाला आहे.
काही दिवसांपूर्वी जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या आपल्या मुलांसमवेत उदरनिर्वाहासाठी स्थानिक खाडीपात्रात कालवे म्हणजेच मुळे काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील खाडीपात्रात कालवे काढण्याच्या कामात मग्न असताना ही पाचही मुले खाडीकिनाऱ्याजवळच होती. मात्र, पाण्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे तसेच पाण्याच्या तळाशी असलेल्या खोल खड्ड्यांची कल्पना न आल्याने मुले अचानक एकापाठोपाठ एक खोल पाण्यात बुडू लागली. लहान मुलांचा आक्रोश आणि आरडाओरडा कानी पडताच जवळच असलेल्या आई-वडिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी जीवाचे रान केले. उपस्थित लोकांच्या तत्परतेमुळे एका मुलीला वेळीच सुखरूप बाहेर ओढण्यात यश आले, परंतु दुर्दैवाने उर्वरित चार निष्पाप भावंडे पाण्याच्या जोरदार प्रवाहात आणि खोल डोहात ओढली गेली.
या दुर्घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले होते. शोधकार्याच्या पहिल्याच दिवशी ६ वर्षीय मोहम्मद जुनेद भाटकर, ९ वर्षीय जुहेरिया जुनेद भाटकर आणि ११ वर्षीय बुशिरा जुनेद भाटकर या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र १५ वर्षांची माहिरा जुनेद भाटकर ही खोल पाण्यात बेपत्ता झाल्याने तिच्या शोधासाठी नाटे सागरी पोलीस, स्थानिक मच्छीमार, बचाव पथके आणि ग्रामस्थांचे अखंड प्रयत्न सुरू होते. अखेर सलग पाच दिवस खाडीच्या कानाकोपऱ्यात चाललेल्या अथक शोधमोहिमेनंतर खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण करून मृतदेह पुढील आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. काळाने एकाच घरातील चार निष्पाप फुलांना हिरावून नेल्यामुळे या भीषण दुर्घटनेने नाणार परिसरात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.शोधमोहिमेच्या केवळ प्रशासकीय सूचना देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी स्वतः बोटीतून खाडीपात्रात जाऊन शोधकार्यात सहभाग घेतला. बेपत्ता मुलीचा शोध अधिक व्यापक पातळीवर घेण्यासाठी त्यांनी विविध यंत्रणांची मदत उपलब्ध करून देण्यावर भर दिला. या मोहिमेसाठी कोस्टगार्डचे कमांडो, हेलिकॉप्टर, रत्नागिरी पोलीस नौका विभागाचे जवान, कायकिंग बोट, मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथक, पोलीस अधिकारी-अंमलदार, सागरी सुरक्षा विभागाचे होमगार्ड आणि स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात आली होती. खाडीपात्राचे स्वरूप, पाण्याची खोली आणि कांदळवनाचा परिसर लक्षात घेता विविध पथकांच्या माध्यमातून शोधकार्य करण्यात आले. बगाटे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवले आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर त्यांच्या व्यापक राबविण्यात आलेल्या शोधकार्याला यश आले आहे.
अशा दुर्घटनेत आपल्या चार मुलांना गमावलेल्या कुटुंबीयांचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. या काळात शोधकार्य सुरू ठेवण्याबरोबरच कुटुंबीयांशी संवाद साधणे आणि त्यांना धीर देणेही महत्त्वाचे ठरते. नितीन बगाटे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहिमेत सहभाग घेतला आणि विविध यंत्रणांना सक्रिय ठेवण्यावर भर दिला होता. त्यांच्या या प्रत्यक्ष सहभागातून आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केवळ प्रशासकीय देखरेखीपुरती मर्यादित नसून, घटनास्थळी समन्वय राखणे आणि नागरिकांच्या दुःखाच्या प्रसंगी उपस्थित राहणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गेल्या पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर माहिराचा मृतदेह मिळाल्याने शोधकार्याचा एक टप्पा पूर्ण झाला असला, तरी या दुर्घटनेने भाटकर कुटुंबावर ओढवलेले दुःख अपार आहे.





























































