
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गोंदिया पथकाने रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. नगरोत्थान योजनेतील विद्युत कामांची बिले मिळाल्यानंतर ठेकेदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून कंत्राटदाराच्या बिलाच्या १५ टक्के रकमेची, म्हणजेच ३ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यापैकी १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. गुडेल्लीवार हे माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, अंबरीशराव आत्राम यांच्या वाढदिवशीच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
‘कामे मी आणली; बिलातील १५ टक्के द्या!’
विभागाच्या अहवालानुसार, तक्रारदार हे ३३ वर्षीय परवानाधारक इलेक्ट्रिकल ठेकेदार असून, अहेरी येथे त्यांचे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान आहे. त्यांच्या मित्राच्या ठेकेदारी फर्मला नगरोत्थान योजना सन २०२५-२६ अंतर्गत अहेरीतील प्रभाग क्रमांक १ ते १० आणि प्रभाग क्रमांक ११ ते १७ मध्ये अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याची कामे मिळाली होती. या दोन्ही कामांची एकूण मंजूर निविदा रक्कम १९ लाख ८७ हजार ७६५ रुपये होती.
यातील प्रभाग क्रमांक ११ ते १७ मधील काम तक्रारदारांनी मित्रासोबत करारनामा करून पूर्ण केले. प्रभाग क्रमांक १ ते १० मधील कामावरही ते देखरेख ठेवत होते. दोन्ही कामे निर्धारित १८० दिवसांच्या मुदतीत पूर्ण झाली आणि त्यांची संपूर्ण बिलेही अदा झाली.
आधी तीस हजार; त्यानंतरही पैशांसाठी तगादा
तक्रारीनुसार, वारंवार होणाऱ्या मागणीमुळे तक्रारदारांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी गुडेलीवार यांना ३० हजार रुपये रोख दिले होते. त्यानंतरही व्हॉट्सअॅप कॉलद्वारे उर्वरित २ लाख ७० हजार रुपयांची मागणी सुरू होती. आणखी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पंचांसमक्ष मागणीची पडताळणी
तक्रारीच्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर रोजी विभागाने लाच मागणीची पडताळणी केली. तक्रारदारांना पंच आणि ध्वनिमुद्रकासह गुडेलीवार यांच्या हार्डवेअर दुकानात पाठविण्यात आले. त्यावेळी गुडेलीवार यांनी उर्वरित २ लाख ७० हजार रुपयांची मागणी करून, सध्या जमतील तेवढे पैसे आणून देण्यास सांगितल्याचे विभागाच्या अहवालात नमूद आहे.
तक्रारदारांनी आपल्याकडे सध्या १ लाख २० हजार रुपये उपलब्ध असल्याचे सांगितल्यानंतर, ती रक्कम थोड्या वेळात दुकानात आणून देण्यास सांगण्यात आले.
रक्कम स्वीकारताच पथकाची कारवाई
पडताळणीनंतर विभागाने सापळा रचला. तक्रारदारांना पंच आणि ध्वनिमुद्रकासह लाचेची रक्कम घेऊन हार्डवेअर दुकानात पाठविण्यात आले. गुडेलीवार यांनी तक्रारदारांकडून १ लाख २० हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.
गुडेलीवार यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही नमूद आहे.
गोंदिया पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे, संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे आणि दीपक बाटबर्वे यांच्या पथकाने सहभाग घेतला.




























































