
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरू असलेली पाच सामन्यांची टी-20 मालिका आता निर्णाय वळणावर आली आहे. बुधवारी (14 ऑक्टोबर 2026) पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाला मालिकेवर कब्जा करण्याची संधी होती. मात्र, वेस्ट इंडिजने दमदार कामगिरी करत सामना जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे आता शनिवारी, 17 ऑक्टोबर रोजी होणारा सामना मालिका विजयाच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. याच पार्श्वभुमीवर टीम इंडियाचा माजी गोलंदाज आर अश्विनने टीम मॅनेजमेंटवर टीका केली आहे.
टी-20 मालिकेतून डावखुरा गोलंदाज कुलदीप यादवला प्लेयिंग इलेव्हनमधून वगळण्याच्या टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर आर अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुलदीपच्या अनुपस्थितीमुळे फरक पडला असता आणि हा निर्णय म्हणजे थोड्या ‘साधारण बुद्धीचा’ अभाव दर्शवणारा असल्याचा दावा त्याने केला आहे. कुलदीपने लखनऊ आणि रांची येथील पहिल्या दोन सामन्यांत खेळल्यानंतर इंदूर आणि हैदराबादमधील पुढील दोन सामन्यांतून त्याला बाहेर ठेवण्यात आले होते.
लखनऊच्या पहिल्या सामन्यात 2 बळी घेतल्यानंतर, टीम इंडियाने गमावलेल्या रांची सामन्यात त्याने 53 धावा दिल्या होत्या. हैदराबादमधील चौथ्या टी-20 सामन्यातही संघाची गोलंदाजी ढेपाळली, जिथे वेस्ट इंडिजने 3 बाद 247 धावा करत टीम इंडियाचा 223 धावांवर पाडाव केला आणि 24 धावांनी सामना जिंकला. वेस्ट इंडिजचे फलंदाज कुलदीपच्या गुगली आणि लेग-स्पिन समजण्यात संघर्ष करत असल्याने, अशा स्थितीत त्याला बाहेर ठेवणे आश्चर्यकारक असल्याचे अश्विनने सांगितले. दरम्यान, पाच सामन्यांची ही टी-20 मालिका सध्या 2-2 अशी बरोबरीत असून, मालिकेचा अंतिम आणि निर्णायक सामना बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे.






























































