
जगभरातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने सुमारे १,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असून, २०२२ नंतरची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात ठरली आहे. कंपनीच्या एकूण कर्मचारीवर्गातील जवळपास ६ टक्के कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार असल्याचे वृत्त ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले आहे. प्रॉडक्ट, तंत्रज्ञान, कायदेशीर आणि मनुष्यबळ व्यवस्थापन अर्थात एचआर विभागातील कर्मचाऱ्यांना या कपातीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस आणि ग्रेग पीटर्स यांनी बुधवारी ई-मेलद्वारे कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली. ग्राहकवाढीचा मंदावलेला वेग, मनोरंजन क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा दबाव, या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार नेटफ्लिक्स सध्या पारंपरिक सबस्क्रिप्शन व्यवसायाच्या पलीकडे जाऊन उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कंपनीला अपेक्षित असलेला वाढीचा वेग अद्याप साधता आलेला नाही. सप्टेंबरच्या अखेरीस ब्लूमबर्गच्या एका कार्यक्रमात बोलताना सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी कंपनीची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे मान्य केले होते. वाढीचा वेग अधिक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
नेटफ्लिक्सच्या आर्थिक कामगिरीबाबतही गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ‘बिझनेस इनसाइडर’च्या वृत्तानुसार, गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३० टक्क्यांहून अधिक, तर एका वर्षात ४० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. कंपनीच्या प्रेक्षकसंख्येतील सहभागाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेटफ्लिक्सने चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ९७ अब्ज तासांचे व्ह्यूइंग नोंदवले. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ सुमारे २ टक्के आहे. मात्र, प्रेक्षकांचा सहभाग किती वाढत आहे आणि ग्राहकांना सबस्क्रिप्शनसाठी खर्च केलेल्या पैशांच्या तुलनेत पुरेसे मनोरंजनमूल्य मिळत आहे का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.


























































