
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. पाचवा सामना शनिवारी, 17 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वगळलं जाणार आहे.
TOI च्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याच कारण म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. वनडे मालिकेनंतर टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे, जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असून दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह या कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त रहावा आणि त्याने दमदार कामगिरी करून टीम इंडियाच्या विजयात खारीचा वाटा उचलावा, अशी संघ व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाच संपूर्ण लक्ष जसप्रीत बुमराहच्या बाबतीत कसोटी मालिकेवर आहे.
सध्या अहमदाबादमध्ये लाल बॉलने सराव करत असलेला बुमराह महिन्याच्या अखेरीस बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये पोहोचेल आणि तिथून न्यूझीलंडसाठी रवाना होईल. वेलिंगटन येथील पहिल्या कसोटीपूर्वी त्याला ‘इंडिया ए’च्या तिसऱ्या सामन्यात मैदानात उतरवून त्याचा वर्कलोड वाढवण्याची योजना आहे. जेणेकरून तो थेट कसोटी मालिकेसाठी तयार असेल. केवळ न्यूझीलंड दौराच नाही, तर भविष्यातील महत्त्वाच्या मालिका डोळ्यांसमोर ठेवूनही हे धोरण आखण्यात आले आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतही (बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी) हीच रणनीती लागू केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडकर्त्यांकडून लवकरच न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे.




























































