
हिंदुस्थानचा महिला संघ पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेला धूळ चारण्यासाठी सज्ज झाला आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत शुक्रवारी रायपूरच्या मैदानात होणार आहे. या सामन्यामध्ये सर्वांचे लक्ष लागले असेल ते स्मृती मानधनाकडे, कारण ती प्रथमच संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे स्मृतीच्या नेतृत्वात हिंदुस्थानचा संघ मालिका विजय साकारतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
स्मृतीवर कर्णधारपदाचा दबाव असेल का, हे या सामन्यात पाहायला मिळेल. शफाली वर्मा ही चांगल्या फॉर्मात आहे. पण मधल्या फळीला मात्र अजूनही लय सापडलेली नाही. हरमनप्रीत कौरवर नेतृत्वाचा दबाव नसल्यामुळे ती कशी फलंदाजी करते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. रिचा घोष, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत यांच्यावर मधल्या फळीची मदार असेल.
संघाच्या विजयात गोलंदाजांनी मोठा वाटा उचलला आहे. श्री चरणी, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी यांच्या कामगिरीवर संघाचा जय-पराजय अवलंबून असेल.
हिंदुस्थानचा संघ – स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, रिचा घोष, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, नंदनी शर्मा, श्री चरणी, मिन्नू मणी.
झिम्बाब्वेचा संघ – केलीस एनधलोवू, प्रिय बिझा, चिपो मुगेरी तिरिपानो, मॉडेस्टर मुपाचिक्वा, शार्न मेयर्स, जोसेफिन एनकोमो, न्याशा ग्वांझुरा, मिशेल मावुंगा, कुडझाई चिगोरा, फ्रान्सिस्का चिपारे, नोमवेलो सिबांडा.



























































