दिल्लीत उपोषणाला बसलेल्या अंकिता भंडारीच्या आईवडिलांना पहाटे चार वाजता पोलिसांनी उचलले, दुष्यंत कुमार गौतम यांची राज्यपालपदी नियुक्ती रद्द करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये झालेल्या अंकिता भंडारी हिच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या तिच्या आईवडिलांना दिल्ली पोलिसांनी आज पहाटे 3.45 वाजता ताब्यात घेतले. अंकिता भंडारी हिचे आईवडील इंडिया गेटजवळ निदर्शनाला बसले होते. तिच्या हत्येप्रकरणी भाजप नेते दुष्यंत कुमार गौतम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्याच दुष्यंत कुमार गौतम यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी अंकिताच्या आईवडिलांनी केली आहे.

अंकिता भंडारी ही उत्तराखंडमध्ये ऋषिकेश येथे एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती. वर्ष 2022 मध्ये एका व्हीआयपीला विशेष सेवा देण्यास तिने नकार दिला होता. त्यामुळे तिची हत्या करण्यात आली होती. या व्हीआयपीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ते व्हीआयपी म्हणजे उत्तराखंडचे भाजपचे माजी प्रभारी दुष्यंत कुमार गौतम आणि भाजपचे सरचिटणीस अजयकुमार असल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी अंकिताचे वडील वीरेंद्र सिंह यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता दुष्यंत कुमार यांना सिक्कीमचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. याविरोधात अंकिताचे आईवडील इंडिया गेट येथे निदर्शनास बसले होते. दरम्यान, उत्तराखंडमध्ये काँग्रेसने राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र निदर्शने केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह अनेक नेत्यांना यावेळी ताब्यात घेण्यात आले. अंकिताच्या हत्येप्रकरणी पुलकित आर्य, हॉटेलचे मॅनेजर सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

न्यायाच्या लढय़ात आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांसोबत

अंकिता भंडारीच्या आईवडिलांची लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी बुधवारी रात्री भेट घेतली होती. आज त्यांना ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. पीडितांचा आवाज दाबणे हेच मोदी सरकारचे वैशिष्टय़ आहे, मात्र न्यायासाठी लढा कधीही थांबणार नाही. काँग्रेस अंकिता भंडारीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.

पुन्हा निदर्शने करू, अंकिताचे आईवडील ठाम

अंकिता भंडारीच्या आईवडिलांना दोन तासांनी सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, दुष्यंत कुमार गौतम यांची नियुक्ती रद्द करावी, ही आमची पहिली मागणी आहे. त्यांची नियुक्ती रद्द होईपर्यंत आम्ही इथेच बसून राहू. इथे परवानगी न दिल्यास आम्ही घरात बसून आमरण उपोषण करू, असे अंकिताची आई म्हणाली.