
मराठमोळ्या विश्वजीत मोरेने 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक जिंकत इतिहास घडविला. त्याने ग्रीको-रोमन प्रकारात हिंदुस्थानला पहिले रौप्यपदक जिंकून देत देशाची मान उंचावली. मात्र, सुवर्णपदकाच्या उंबरठय़ावर असलेल्या विश्वजीतची नशिबाने साथ सोडली. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्झे याने विश्वजीतला 13-12 अशा अवघ्या एका गुणाने पराभूत केले. त्यामुळे सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरे राहिले; पण विश्वजीतने हिंदुस्थानी कुस्तीच्या इतिहासात आपले नाव कोरले.
विश्वजीतचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही तितकाच दमदार ठरला. मेक्सिकोच्या इसाक मारिन माटावर 10-8 अशी मात करत त्याने विजयारंभ केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर इराणचा युवा विश्वविजेता आर्मिन शमसीपूर याचे आव्हान होते. प्रतिस्पर्ध्याच्या खांद्याला दुखापत झाल्याचा फायदा घेत विश्वजीतने चार गुणांचा जोरदार डाव टाकला आणि 8-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत रशियाच्या मलिक गिगिएव याच्याविरुद्ध रंगलेली लढत चुरशीची झाली. दोन्ही मल्लांनी पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याची संधी वापरली, मात्र अखेर विश्वजीतने 6-4 अशी बाजी मारत अंतिम फेरीत धडक दिली. या कामगिरीसह 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारात अंतिम फेरी गाठणारा तो हिंदुस्थानचा पहिलाच मल्ल ठरला. यापूर्वी त्याने या स्पर्धेत दोन कांस्यपदकेही जिंकली आहेत. या गटात दोन पदके जिंकणारा तो हिंदुस्थानचा एकमेव ग्रीको-रोमन मल्ल ठरला आहे.
पदकांच्या स्वप्नावर व्हिसाचा घाला
एकीकडे विश्वजीतने आखाडय़ात हिंदुस्थानचा झेंडा उंचावला असताना दुसरीकडे हिंदुस्थानी कुस्तीच्या मोहिमेला व्हिसाच्या अडथळ्याचा फटका बसला. लास वेगास येथे झालेल्या या स्पर्धेसाठी ग्रीको-रोमन आणि महिला कुस्ती प्रकारांतील हिंदुस्थानच्या नऊ मल्लांना अमेरिकेने व्हिसा नाकारला. हे मल्ल 20 वर्षांखालील असून त्यांच्याकडे पूर्णवेळ नोकरी नसल्याचे कारण देण्यात आल्याचा दावा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी केला.
‘अमेरिकन दूतावासाने नऊ हिंदुस्थानी मल्लांचे व्हिसा अर्ज बेरोजगार असल्याच्या कारणावरून फेटाळले. हा प्रकार प्रथमच घडला आहे. जागतिक कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांनीही याबाबत पत्र लिहिले होते. या निर्णयामुळे हिंदुस्थानच्या पदकांच्या संधींना मोठा फटका बसला. व्हिसा नाकारलेल्या नऊ मल्लांपैकी किमान दोघे सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार होते,’ असा आरोप संजय सिंह यांनी केला.
महिलांचीही पदकाच्या दिशेने वाटचाल
महिलांच्या स्पर्धेत हिंदुस्थानच्या वैष्णवी पाटील (65 किलो) आणि अमृता पुजारी (72 किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अमृताला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. कोमल आणि दीक्षा मलिक यांची पदकाची आशा अद्याप कायम आहे. उपांत्य फेरीत युक्रेनच्या अलिना फिलिपोविचकडून तांत्रिक वर्चस्वाच्या आधारे पराभूत झालेल्या कोमलला आता कांस्यपदकासाठी झुंज द्यावी लागणार आहे. दीक्षा मलिक 76 किलो वजनी गटात पदकाच्या शर्यतीत आहे. मात्र मानसी लाठरला 68 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या लॉरा गोडिनोविरुद्ध 9-10 अशा अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. ग्रीको-रोमन प्रकारात चेतन (63 किलो) उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला, तर करण कांबोज (87 किलो) याला पात्रता फेरीत तांत्रिक वर्चस्वाच्या आधारे हार पत्करावी लागली.























































